ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 ऑगस्ट : महायुती सरकारच्यावतीने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली असताना आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे मतदारसंघातील महिलांसाठी अनोखी भेट मिळणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्यावतीने मतदारसंघातील प्रत्येक घरी एक साडी देण्यात येणार आहे. आमदार पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी एक नाविन्यपुर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे यायला सुरूवात झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
रक्षाबंधानिमित्त साडी भेट –
जरी राज्य सरकारने ही नाविन्यपुर्ण योजना राबविली असली. तरी मी माझ्यावतीने पाचोरा-भडगाव मतदारसंघातील बहिणींसाठी प्रत्येक घरी एक साडीची भेट म्हणून देत आहे. आजपासून ही साडी वाटपाला सुरूवात झाली असून मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये महिलांच्यावतीने घरोघरी साडी दिली जाणार आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. साडी भेट दिली जात असताना साधारणतः आठ दिवसांचा वेळ लागेल. म्हणून कुणीही यासाठी घाई करू नये. एकही घर साडीपासून वंचित राहू नये, याची जबाबदारी स्विकारून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिल्या.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत