ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात मी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत असून यासाठी माझा अनुक्रमांक हा 9 आहे. खरंतर, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर प्रचाराला वेग आला असून माझ्यासह कार्यकर्ते गावागावात जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले.
माजी आमदार दिलीप वाघ पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष निवडणूक लढवत असल्याने मला शिट्टी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. ग्रामीण भागात शिट्टी हे प्रचलित चिन्ह असून ग्रामपंचायती तसेच सोसायटी यांसारख्या अनेक निवडणुकांमध्ये शिट्टी या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणून गावागावात परिचय असलेले शिट्टी हे चिन्ह आहे. दरम्यान, आमच्या प्रचाराला गावागावात मोठा प्रतिसाद मिळत असून शिट्टी वाजवा आणि क्रांती घडवा, असेही आम्ही मतदारांना सांगत असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले.
दिलीप वाघ अपक्ष म्हणून रिंगणात –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर आल्याने याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली सुर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप वाघ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघातील लढतीत मोठी चुरस वाढवली आहे.
हेही वाचा : महिला व मुलींना मोफत बस प्रवाससह महाविकास आघाडीची महाराष्ट्राला पाच गॅरंटी; नेमक्या काय आहेत घोषणा?