एरंडोल, 30 जुलै : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथील वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि शोषणाचे घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याच वसतिगृहातील एका 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
वसतिगृहातील मुलावर अत्याचार –
खडके बुद्रूक येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसतिगृहात 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्याला मारहाण केल्याची तक्रार एरंडोल पोलिसात देण्यात आली आहे. यासंबंधित मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, होळीच्या दिवशी त्या मुलाने पाणी भरण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपी गणेश याच्या सांगण्यावरून वसतिगृहातील आठ मुलांनी या बालकाला मारहाण केली होती. तसेच एके दिवशी दुपारी हा मुलगा वॉशरूमला गेला असताना आरोपी गणेशने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला.
चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल –
मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थाध्यक्षासह चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील (60), सचिन प्रभाकर पाटील (30) भूषण प्रभाकर पाटील (28), गणेश शिवाजी पंडीत (29) यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, वसतिगहातील काळजीवाहक गणेश पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.
मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण –
खडके येथील बालगृहात वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजीवाहकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आली. याप्रकरणी काळजीवाहक अधीक्षक व सचिव अशा तीन जणांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित ( वय 32) आणि अधीक्षिका अरुणा गणेश पंडित (29) यांना अटकेत आहे. तर सचिव भिवाजी पाटील हा फरार आहे. या वसितगृहात आधी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण व आता त्याच बालगृहातील मुलावरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.