मुंबई, 2 ऑक्टोबर : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रूपये मिळतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार हस्तांतरित –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणारी योजनांपैकी एक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9 कोटी 25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे 5 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत.
9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार जमा होणार-
एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता म्हणजे 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना 18 वा हप्ता देण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. दरम्यान, भारत सरकारने फार पूर्वीच सर्व शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्याच्या सूचना दिल्या असून केवायसी करणे बंधनकारक आहे.
ई-केवायसी कशी करायची? –
शेतकरी आता घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर, ‘फार्मर्स कॉर्नर’ (Farmers Corner)चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर शेतकऱ्यांना ‘e-KYC’ चा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करा. येथे संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि नंतर ‘ओटीपी मिळवा’ (OTP) वर क्लिक करा. यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो तिथे भरल्यानंतर, सेव्ह करा. यानंतर संबंधित शेतकऱ्याचे ई-केवायसी केले जाईल.
काय आहे पीएम किसान योजना? –
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. यामध्ये एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती आणि अद्याप ही योजना सुरु आहे. तसेच आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मंजूर करण्यात आला. यानंतर आता वाशिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
हेही पाहा : आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला – उपमुख्यमंत्री अजित पवार