चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडी राज्यात घडल्याने यावेळी निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो, तसेच निवडणुकीनंतर कुणाचे सरकार येते, कोण मुख्यमंत्री होते, याची सर्वांना उत्सुकता लागली. यंदाच्या निवडणुकीत पक्षफुटीचा अनेकांना फटका बसला आहे. तर त्यासोबतच अनेकांना संधीही मिळाली आहे. मात्र, यातच काही ठिकाणी पक्षाच्या वतीने उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करत किंवा पक्षाचा राजीनामा देत विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. खान्देशचा विचार केला असता याठिकाणी तर माजी खासदार यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याचबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्र विधानसभेच्या यावेळच्या निवडणुकीत अनेक खासदारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये वाशिमच्या माजी खासदार भावन गवळी यांसारख्या नावाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत यश न मिळाल्याने किंवा त्यावेळी तिकीट कापले गेल्याने हे खासदार आता विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यामध्ये खान्देशचा विचार केला असता याठिकाणी जळगावमधील 2 तर नंदुरबारमधील 1 माजी खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील उन्मेश पाटील आणि ए. टी. पाटील तर नंदुरबार जिल्ह्यातील डॉ. हिना गावीत यांनी शेवटपर्यंत माघार न घेता आपला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी आपला अर्ज कायम ठेवला आहे.
माजी खासदार उन्मेश पाटील –
उन्मेश पाटील हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले. त्यात ते विजयी झाले आणि आमदार झाले. त्यानंतर भाजपने 2019 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. त्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत ते खासदार झाले होते. मात्र, 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापले आणि त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाळीसगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माजी खासदार ए. टी. पाटील –
ए. टी. पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2009 ते 2014 अशी तब्बल 10 वर्षे खासदार होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापले. त्यानंतर बराच काळ ते सक्रिय नसल्याचे दिसून आले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा सक्रिय झाले. उन्मेश पाटील यांचे तिकीट कापल्यावर ए. टी. पाटील यांना जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळेल, असेही बोलले जात होते. मात्र, स्मिता वाघ यांना भाजपने संधी दिली आणि त्या निवडणुकीत विजयी झाल्या. यानंतर मात्र, आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ए. टी. पाटील यांनी एरंडोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण राज्यात महायुतीची सत्ता असल्याने एरंडोल हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला आणि शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांचे पूत्र अमोल पाटील यांना शिंदे गटाच्या वतीने याठिकाणी तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे ए. टी. पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत एरंडोल मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार ते माघार घेतील, अशी चर्चा होती. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी माघार न घेता ते आपल्या उमेदवारीवर कायम राहिले असून आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामारे जात आहे.
माजी खासदार डॉ. हीना गावीत –
खान्देशातील नंदुरबार लोकसभा हा भाजपसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ राहिला आहे. याठिकाणी 2014 ते 2024 अशी दहा वर्षे भाजपच्या डॉ. हीना गावीत या खासदार होत्या. यंदाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी त्यांच्या पराभव केला. यानंतर मात्र, आता पुन्हा त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा मतदारसंघ भाजपला सुटावा, यासाठी त्या आग्रही होत्या. मात्र, हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे महायुतीतील शिस्त म्हणून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आणि अपक्ष म्हणून त्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिंदे गटाचे आमश्या पाडवी यांचे आव्हान आहे.
अशाप्रकारे उन्मेश पाटील, ए. टी. पाटील आणि डॉ. हिना गावीत यांची खासदारकीची संधी हुकली. त्यामुळे ते आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनता त्यांना यावेळी संधी देते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, भडगाव शहरातील थेट जनतेशी संवाद…