नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भारत सरकारच्या वतीने डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत संपूर्ण भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल रात्री नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी पर्यंत संपूर्ण भारतभर 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळला जाईल, असा निर्णय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.
या कालावधीत संपूर्ण भारतामध्ये जेथे राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकवला जातो तेथे तो अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच या राष्ट्रीय दुखवटा कालावधी कोणतेही अधिकृत मनोरंजन होणार नाही. यासोबतच परदेशातील सर्व भारतीय मिशन्स/भारतीय उच्चायुक्तालयांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशीही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द –
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
2004 ते 2014 देशाचे पंतप्रधान –
यूपीए सरकारने 2004 मध्ये बहुमत गाठल्यावर डॉ. मनमोहन सिंह हे पहिल्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. मात्र, मनमोहन सिंहा यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. यानंतर 2009 मध्ये पुन्हा यूपीएची सत्ता आल्यावर मनमोहन सिंह यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.