मुंबई, 2 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती तसेच परिवर्तन शक्तीसह इतर पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आता 4 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच माघारीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे.
माघारीसाठी उरले दोन दिवस –
राज्यात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. असे असताना उमेदवारांकडून प्रचारही थंडावल्याचे दिसून येत आहे. दिवाळी ही 3 नोव्हेंबर रोजी संपत असून 4 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी तसेच महायुतीत झालेले बंड थंड करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहे. दरम्यान, माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ठ होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
‘असे’ आहे विधानसभा निवडणुकीचे पुढील वेळापत्रक –
विधानसभा निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबर ही माघार घेण्याची मुदत आहे. यानंतर 18 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, माघार घेण्याच्या तारखेनंतर उमेदवारांना अवघे 14 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत.
राज्यात सुरू होणार प्रचारसभांचा धडाका –
विधानसभा निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबर माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून प्रचारसभांना प्रारंभ होणार आहे. महायुतीच्या प्रचारसभांची सुरूवात ही कोल्हापूरातून होणार असून करवीरनगरीत 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही सभा पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडणार आहे.