धरणगाव, 13 नोव्हेंबर : मला मान्य आहे की, मतदारसंघात चार कामं कमी केले असतील मात्र, व्यापारी, नोकरदार किंवा कोणत्याही एका माणासाने सांगावं की, गुलाबराव पाटलाने त्याला त्रास दिलाय…मी माझं राजकारण सोडून देईन, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आमचा जनता दरबार सर्वांना खुला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलते होते. दरम्यान, विरोधकांवर जोरदार टीका करत निश्चितपणे मी या मतदारसंघात निवडून येणार असल्याचा विश्वास या सभेत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निम्न तापी प्रकल्प , नारपार, भागपूर या सर्व प्रकल्पांना निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सुंदर रस्ते झाले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्याची भरभरून कामे केली. मात्र, ते उठले सुटले की धरणगावचे पाणी काढत बसतात. अरे बाबांनो, तेथे प्रशासक आहे, 20 तारीख जाऊदे मग मी बघतो, प्रशासकाला कसे पाणी पाजत नाही तो, असे मंत्री पाटील म्हणाले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार लताताई सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : “किशोर आप्पा माझा मानसपुत्र; पुढच्या टप्प्यात हा मतदारसंघ मी दत्तक घेणार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे