चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला झाला. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेले नाही. हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय.
काय म्हणाले मंत्री भरतशेठ गोगावले –
नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान, याठिकाणी माध्यमांशी बोलताना भरतशेठ गोगावले म्हणाले की, खातेवाटपाबाबत तिन्ही पक्षांची हरकत नाही. तिन्ही नेत्यांनी बसून काल सर्व ठरवलं आहे. कदाचित आज खातेवाटप जाहीर होईल, असं आम्हाला वाटतंय. आताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडून चहापाणी, नाश्ता करुन आलेलो आहोत. त्यामुळे आज होईल, असं वाटतंय.
ते मुख्यमंत्री आहेत. ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष दोन्ही नेते मिळून तिन्ही जण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. त्यामुळे मग आज पालकमंत्री घोषित करत आहेत, मंत्रीपद घोषित करत आहेत, खातेवाटप हे आज कदाचित जाहीर होईल, असं आम्हाला वाटत आहे, असे ते म्हणाले.
15 डिसेंबरला झालाय शपथविधी –
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी 5 डिसेंबरला झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होते. अखेर हा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे राजभवन याठिकाणी झाला. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. यानंतर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर मंत्र्यांच्या शपथविधीच्या 6 दिवसांनंतर आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.