मुंबई, 1 जानेवारी : धुळे जिल्ह्यातील बोरविहिर भागात राहणारे तथा भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेले चंदु चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. अशातच चंदु चव्हाण या बडतर्फ जवानाने आज मंत्रालयाच्या बाहेर पुन्हा एकदा आंदोलन केले. यावेळी आपल्या लहान मुलांसह कुटूंब ही या आंदोलनात सहभागी असल्याचे पाहायला मिळाले. याआधीही त्यांनी सैन्याच्या वर्दीवर असताना विविध ठिकाणी आंदोलन केली आहेत.
बडतर्फ चंदु चव्हाण या जवानाचे मंत्रालयासमोर आंदोलन –
चंदु चव्हाण हे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहचले होते. नियमांच्या बाहेर जाऊन कृत्य केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली. एवढच नाही तर कर्तव्यावर असताना ही त्यांनी अनेक नियम मोडल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले असून भारतीय लष्कराकडून बडतर्फची कारवाई केली आहे. यानंतर चंदु चव्हाण यांनी अनेक परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांना सांगत म्हणत आतापर्यंत विविध ठिकाणी आंदोलन केले आहे.
‘माझ्यावर कारवाई करताना मानवाधिकाराचे उल्लंघन -‘
चंदु चव्हाण हे यांचे मंत्रालयासमोरील आंदोलन सुरू असताना त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखले. यावेळी चंदु चव्हाण यांनी संतप्त होत प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी भारतीय सैन्यात 11 वर्ष सेवा झाली. दरम्यान, मला 5 वेळा सजा झाल्या. यानंतर मला बडतर्फ करण्याते. मी त्यावेळी त्यांना सांगितले की, ही सजा मला 1950 च्या कायद्यानुसार देण्यात आली आहे. यामध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन झालेले आहे, असे चंदु चव्हाण यावेळी म्हणाले. दरम्यान, भारतीय सैन्याने माझ्यावर केलेल्या कारवाईमुळे मला भारतात कुठेही नोकरीचा अधिकार नाही. यामुळे 12 लाखाचे कर्ज कसे फेडायचे आणि 2 वर्षाच्या मुलासह माझे कुटुंबाचे उदरनिर्वाहण कसे करायचे असा प्रश्न देखील चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
चंदु चव्हाण यांचे गंभीर आरोप –
भारतीय सैन्यात सेवा करत असताना जवानांवर अन्याय करत आतपर्यंत 15 लाख जवानांना फौजमधून काढण्यात आल्याचा आरोपही चंदु चव्हाण यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संरक्षण मंत्रालय केंद्र तसेच राज्य सरकार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या 299 बटालियनमधील शिवप्रसाद भिला पाटील हे देखील आंदोलनात सहभागी होते. 2003 साली भरती झाले आणि 2007 साली त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
…अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका –
वर्धमान अभिनंदन हे पाकिस्तानातून आल्यानंतर त्यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात येतो. मात्र, माझ्यासारख्या जवानाला युद्धात पकडलेला कैदी म्हणून माझा उल्लेख केला आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी चंदु चव्हाण यांना मंत्रालयासमोर आंदोलन करण्यास नकार दिल्यानंतर चव्हाण आक्रमक झाले. पोलीस आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आम्ही येथून जाणार नाही अथवा आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका, असे ते चव्हाण यावेळी म्हणाले.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive