मुंबई, 20 जानेवारी : राज्य सरकारच्यावतीने नुकतीच पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, यामुळे महायुतीत वाद निर्माण झाल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आली आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती –
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून (शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे.
रायगडमध्ये नेमका काय वाद –
गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या मंत्री आदिती तटकरे ह्या रायगडच्या पालकमंत्री म्हणून काम सांभाळत होत्या. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. अशातच रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले भरत गोगावले यांना डावल्याने रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देखील दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काल रात्री उशिराने रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकमध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण –
नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांना नाशिकचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दादा भूसे यांना नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात यावे, अशी देखील मागणी शिवसैनिकांकडून केली जात असताना आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी –
शिंदेंच्या शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल जळगावात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भरत गोगावले व दादा भूसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी आम्ही जे काही केलंय त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे भाजपचे नाव न घेता ते म्हणाले आहेत. आमचे जे दोन शिलेदार आहेत. त्यांना पालकमंत्रीपद का नाही? याची निश्चितपणे विचारणा झाली पाहिजे, असेही मंत्री पाटील म्हणाले.