पुणे, 24 फेब्रुवारी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आणि अमरावती शहराचे पहिले महापौर देवीसिंह शेखावत यांचे आज सकाळी निधन झाले. गत चार वर्षांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. आज पुण्यात सकाळी 9.26 मिनिटांच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 89 वर्षाचे होते.
विधानसभेत केले अमरावतीचे नेतृत्त्व –
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असणारे डॉ. देवीसिंह शेखावत यांनी विधानसभेत 1985 ते 1990 दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. यानंतर 1990 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणि 1991 मध्ये पहिल्यांदाच झालेल्या अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर ते अमरावतीचे पहिले महापौर झाले.
पुण्यात केले जाणार अंत्यसंस्कार
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 15 जुलै 2012 ला संपल्यानंतर त्या आणि डॉ. देवीसिंह शेखावत हे पुण्यात स्थायिक झाले. आज सकाळी डॉक्टर देवीसिंह शेखावत यांचे निधन झाल्याची माहिती अमरावतीत पोहोचताच त्यांचे येथील नातेवाईक तसेच विद्याभारती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी पुण्याला रवाना झाले. आज सायंकाळी त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
शिक्षक ते राजकारणी असा प्रवास –
डॉ. देवीसिंह शेखावत यांना 1972 मध्ये मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी बहाल करण्यात आली होती. सुरुवातीला ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नेरपिंगळा येथील शाळेत शिक्षक होते. त्यानंतर श्री शिवाजी महाविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवले. दरम्यान, 1969 मध्ये त्यांनी विद्याभारती शिक्षण संस्थेची स्थापना करून अमरावती शहरातील मुरबाग परिसरात पहिली शाळा सुरू केली. संस्था स्थापन केल्यावर दुसऱ्याच वर्षी शिवणगाव येथे देखील शाळा उघडली. 1971 मध्ये त्यांनी अमरावती शहरातील कॅम्प परिसरात विद्याभारती महाविद्यालय सुरू केले. आज या महाविद्यालयात सर्वच शाखेचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
7 जुलै 1965 ला झाले लग्न –
डॉ. देवीसिंह शेखावत हे उच्चविद्याविभूषित असल्यामुळे त्यांना जळगाव येथील प्रतिभाताई पाटील यांचे स्थळ आले आणि 7 जुलै 1965 रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचे पुत्र मुलगा रावसाहेब शेखावत हेदेखील 2009 ते 2014 दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.