मुंबई : औरंगजेबाचे गोडवे गायल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना निलंबित करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यांना हे व्यक्तव्य चांगलच भोवलं आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अबू आझमी यांचा निषेध करत मोठी मागणी केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
यावेळी विधानसभा सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचं म्हणजे औरंग्याचे गोडवे अबू आझमीने गायले. अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीने यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळीही अबू आझमी हा वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं, म्हणजे हा अबू आझमी, देशद्रोही आहे आणि म्हणून या देशद्रोह्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आपण छावा बघा. रईस…. छावा सिनेमा बघा.
या छत्रपती संभाजी महाराजांना हलाल केले. 40 दिवस, त्यांचे डोळे काढले, त्यांची नखं काढली, त्यांची जिभ छाटली, अंगाची सालटी सोलली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असा अपमान केला. अशापद्धतीने त्यांचे हाल केले. 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार केले. धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंग्याचं याठिकाणी गोडवे गाणं म्हणजे, खऱ्या अर्थाने, आपल्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आहे. आपल्या देशभक्तिचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की, देशधर्मपर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी, परमप्रतापी एक ही शंभू राजा था.
या शंभूराजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या. लाज वाटली पाहिजे. या औरंगजेबने आपली मंदिरे तोडली. मंदिरे तोडून टाकली. आया बहिणींचा अत्याचार केला. आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा औरंगजेब. या क्रूरकर्म्याने बापाला कैद केलं. मुलाला मारुन टाकलं. म्हणून अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल पाहिजे, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाचे गोडवे गायल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना निलंबित करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जय भवानीच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले.