मुंबई : जळगाव जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार अजून फरार आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. तिथेही एक आका बसला आहे. मागील 5-6 वर्षात तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करू शकले नाही, कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. वरुन डायरेक्ट फोन येतो, असा दावा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीची जर हिम्मत वाढत असेल आणि आतापर्यंत आरोपी जर पकडला जात नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. एसपींवर कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शाळांमध्येही दप्तरामध्ये मुले आता चाकू घेऊन यायला लागली –
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी तारांकित प्रश्न मांडत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीची स्थिती मांडली. यावेळी ते म्हणाले की, भुसावळ शहर हे गुन्ह्यागारांचं प्रमुख केंद्र आहे. जवळपास 500 पेक्षा जास्त रेल्वे याठिकाणी येतात आणि जातात. त्यामुळे गुन्हेगारीला याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाव आहे. याठिकाणी वारंवार गुन्हे घडत असताना पोलिसांची सख्या मर्यादित आहे. मागच्या वर्षी 82 होते. आता 62 झाले. याठिकाणी गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे की, सेंट अलायन्स, पोद्दार शाळा या सारख्या नामांकित शाळांमध्येही दप्तरामध्ये मुले आता चाकू घेऊन यायला लागली आहेत. त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवणार का, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार का आणि या सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी याठिकाणी केला.
कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही गावात आता बनावट कट्टे मिळतात –
जळगाव जिल्ह्यात एका वर्षात मागच्या वर्षी 64 खून झाले आणि या वर्षी 63 खून झाले. तर अशाप्रकारे, मोठ्या प्रमाणावर खून, दरोडे, चोऱ्या, मारामारी, बलात्कार, विनयभंग या सर्व घटना जळगाव जिल्ह्यात वाढत चालल्या आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. याठिकाणी बनावट रिव्हॉल्व्हर मोठ्या संख्येने मिळतात. याचे कारखाने याठिकाणी आहेत. उमर्टी या गावात याचा कारखाना आहे आणि तो कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मागच्या दोन महिन्यात प्रयत्नही केले. कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही गावात आता असे बनावट कट्टे मिळतात. अशा स्थितीत या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था जी बिघडलेली आहे, ते दुरुस्त करण्यासाठी काही खास उपाययोजना करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी याठिकाणी केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, मुक्ताईनगर तालुक्यात वारंवार मी गुन्हेगारीचे विषय मांडले. मात्र, कारवाई शून्य आहे. माझ्या नातीचा प्रकार तुम्हाला माहिती आहे, अजूनपर्यंत तुम्हाला गुन्हेगार पकडता आलेले नाही. या राज्यात नेमकं काय चाललंय?, महिलांवर असे अत्याचार होत असताना गुन्हेगार जर अद्याप पकडले जात नसतील, तर जळगाव जिल्ह्यातील ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करणार आहात, त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात, असा सवाल त्यांनी केला.
याबाबत उत्तर देताना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर म्हणाले की, 10 जानेवारीला त्याठिकाणी खून झाला होता, ही बाब खरी आहे आणि दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल केला आणि 9 पैकी 7 आरोपींना अटक करण्यात आली. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच आपली सूचना मान्य करुन तत्काळ पोलिसांचं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुक्ताईनगरची घटना अतिशय धक्कादायक आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत आणि लवकरात लवकर आपण आरोपींवर कारवाई करू.
डीएसपी वगैरे सर्वजण दबावाखाली काम करतात –
यावर एकनाथ खडसे म्हणाले की, हे ठोस उत्तर आहे का? इतक्या महत्त्वाचा हा प्रश्न तारांकित प्रश्न म्हणून आपण विचारत असताना मंत्रिमहोदयांकडून काही अपेक्षा आहे की नाही?, जळगाव जिल्ह्यात मागच्या वर्षी 64 खून झाले. यावर्षी 63 खून झाले. दरोडे वाढत चालले. पोलिसांच्या संदर्भात माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की, पोलीस यासंदर्भातील कार्यवाही करत नाहीत. डीएसपी वगैरे सर्वजण दबावाखाली काम करतात. गुन्हेगारांना सोडून देण्याचं प्रमाण त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलंय. तक्रार करुन शून्य उपयोग आहे.
माझा अनुभव असा आहे की, डीएसपीकडे मी पुराव्यानिशी तक्रारी केल्या. पण त्यावर फारशी कार्यवाही होत नाही. मग कुणाच्या इशाऱ्यावर चालतात. गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार अजून फरार आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. तिथेही एक आका बसला आहे. मागील 5-6 वर्षात तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करू शकले नाही, कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. वरुन डायरेक्ट फोन येतो.
ही दुर्दैवाची बाब –
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीची जर हिम्मत वाढत असेल आणि आतापर्यंत आरोपी जर पकडला जात नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. एसपींवर कार्यवाही झाली पाहिजे. गुन्हेगारांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी त्याठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. भुसावळ शहरात जेलची व्यवस्था आणि सेशन कोर्ट आहे. लहानसे तालुक्या पातळीवरचे जेल आहे. सेशन कोर्ट असल्याने मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी कैद्यांना ठेवण्याची तुरुंगाची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी करत जळगाव जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी संदर्भात तुम्ही काय करणार आहात, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
तर अशा आका त्यांना कुठल्याही प्रकारचा वरदहस्त राहत नाही. मागच्या काही दिवसात वेगवेगळ्या जिल्ह्यातील आकांना आपण त्याठिकाणी तुरुंगात टाकले आहे. पोलीस प्रशासनाने त्याठिकाणी कठोर कारवाई केलेली आहे. तसेच आधीच्या काळाच्या तुलनेत आता गुन्हे उघडकीस येत असल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग केली जात आहे. अचानकपणे ऑलआऊट कोंबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्या प्रमाणावर एमपीडीए आणि हद्दपाराची कार्यवाही केली जात असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी सभागृहात सांगितले.