नवी दिल्ली, 26 एप्रिल : नुकताच केंद्रीत लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल लागला. या परिक्षेत शक्ती दुबे या तरुणीने देशात पहिली रँक मिळवली. तसेच याच परिक्षेत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील बिरदेव ढोणे या तरुणाने दैदिप्यमान असे यश मिळवले आहे. त्याच्या या अत्यंत संघर्षमय प्रवासात मिळवलेल्या यशामुळे देशात पहिली रँक मिळवलेल्या शक्ती दुबे या तरुणीने मराठमोठ्या बिरदेवचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये शक्ती दुबे हिने म्हटले की, घनदाट जंगलात मेंढ्या चरत असताना बिरदेवला अचानक त्याच्या मित्राचा फोन येतो. मित्र ओरडतो, “बिरदेवा, तू पास झालास! तुला UPSC मध्ये 551 वा क्रमांक मिळाला, तू अधिकारी झालास!” हे ऐकताच बिरदेव यांचे डोळे आनंदाने भरून आले.
बिरदेव हे अत्यंत गरीब कुटुंबातून येतात आणि त्यांचे वडील मेंढ्या आणि शेळ्या चरतात. आर्थिक अडचणी असूनही UPSC सारखी खडतर परीक्षेत त्यांनी यश मिळवले. त्यांची 551 वी रँक ही त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचा पुरावा आहे. प्रतिकूल परिस्थितीत मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी हे यश प्रेरणादायी आहे’, या शब्दात यूपीएससी परिक्षेत देशात पहिली रँक मिळवलेल्या शक्ती दुबे या तरुणीने मराठमोठ्या बिरदेवचं कौतुक केलं.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये बिरदेव ढोणे या तरुणाने देशात 551 वी रँक मिळवत मोठे यश मिळवले. बिरदेव ढोणे हा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील रहिवासी आहे. बिरदेव ढोणे याच्या वडिलांचा वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय आहे. त्यामुळे लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनचं गेलं. अशा परिस्थितीत त्याने मिळवलेल्या या अत्यंत मोठ्या यशामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.