नवी दिल्ली, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल 10 मे संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे भारत-पाक युद्धाला विराम मिळाला असून तणावपूर्ण परिस्थिती सध्या निवळत चालली आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू केल्यानंतर पुढची चर्चा ही सोमवारी 12 मे रोजी होणार आहे. दरम्यान, शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय, हे जाणून घेऊयात.
शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? –
“शस्त्रसंधी” (Ceasefire) म्हणजे दोन युद्धरत पक्षांनी, विशेषतः देशांनी किंवा लष्करी गटांनी, एकमेकांवर चालू असलेली शस्त्रसज्ज कारवाई थांबवण्यासाठी केलेला करार होय. अर्थात शस्त्र म्हणजे हत्यारे आणि संधी म्हणजे थांबवणं किंवा विश्रांती. याचाचा अर्थ शस्त्रसंधीद्वारे दोन देशात सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांवर तात्पुरती बंदी आणण्यात येते. मात्र, शस्त्रसंधीचा हा निर्णय तात्पुरता किंवा दीर्घकालीन असू शकतो.
शस्त्रसंधी (Ceasefire) लागल्यानंतर काय होतं? –
शस्त्रसंधी लागू केल्यानंतर सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांमधून तात्पुरती माघार असते. दोन देशातील लढाई थांबवण्यासाठी तात्पुरता निर्णय घेतलेला असतो. यामध्ये राजकीय किंवा कायदेशीर तोडगा निघालेला नसतो, केवळ लढाई थांबवलेली असते. दरम्यान, कोणत्याही वेळी शस्त्रसंधी मोडली जाऊ शकते.
भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी –
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ला करत निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. यानंतर गेल्या 17 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काल सायंकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्यात आली. असे असले तरी ही शस्त्रसंधी लागू केल्यानंतर अवघ्या तीन तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. मात्र, भारताने कठोर इशारा दिल्यानंतर 10 मे रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठेही शस्त्रसंधींचे उल्लंघन झालेले नाहीये.