मुंबई, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थी करण्याचा काय संबंध होता असा सवाल उपस्थित करत मोदी 500 देश फिरून आलेत पण भारताचा एकही मित्र नाही. पाकिस्तानविरोधात भारताच्या पाठीमागे कुणाही उभे राहिले नाही, असे राऊत म्हणाले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धविराम करून त्यांनी सिंदुरचा अपमान केला, अशी टीकाही राऊतांनी केंद्र सरकारवर केलीय.
संजय राऊत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, ट्रम्प हे कोणत्या अधिकारात मध्यस्थी करत आहेत? भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असून 140 कोटी लोकसंख्येचे महान राष्ट्र आहे. मोदींचे मित्र भारताच्या मागे उभे राहिले नाहीत. दोन्ही देशांसोबत आमचे चांगले संबंध आहेत, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो..मात्र, ते कोणत्या आधारावर? कोणत्या अटी-शर्तीमुळे? मध्यस्थी करत आहेत. दरम्यान, आता अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या? असा सवाल उपस्थित करत आज इंदिरा गांधी राहिल्या असत्या तर पाकिस्तान राहिलंच नसतं, असे राऊत म्हणाले आहेत.
…तोपर्यंत ऑपरेशन सिंदुर पुर्ण होत नाही – संजय राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले की, सहा अतिरेक्यांनी 26 महिलांच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं. ते 6 अतिरेकी कुठे आहेत? खरंतर, जोपर्यंत या सहा अतिकाऱ्यांचा खात्मा होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदुर पुर्ण होत नाही. कुणी गुडघे टेकले. आमचं दुर्दैव आहे की, असे राज्यकर्ते आम्हाला लाभले. दरम्यान, अमेरिकाच्या राष्ट्रध्यक्षांचा दबाव 1971 साली इंदिरा गांधी यांनी धुत्कारून लावला होता.
युद्धबंदीची खरच गरज होती का? लाहोर ताब्यात आले. तसेच कराची ताब्यात आले आणि इस्लामाबादमध्ये बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? खरंतर, नरेंद्र मोदी-अमित शहा यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, कोणत्या अटी-शर्तीवर तुम्ही ही युद्धबंदी झाली? यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला पाहिजे आणि त्या बैठकीला पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थित राहणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
तुम्ही सिंदुरचा अपमान केलाय –
पहलगाम हल्ल्यात 26 माय-भगिनींचा सिंदूर पुसला गेला. या देशाच्या हुतात्म्यांचा तसेच त्या महिलांनी केलेल्या त्यांच्या त्यागाचा केलेला हा अपमान आहे. हे सिंदूर-बिंदूर सर्व राजकारण खोटं असून मी स्पष्टपणे सांगत की, या क्षणी माघार घ्यायची काहीच गरज नव्हती. दरम्यान, जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोहोचलेलो आहोत, तेव्हा कोणाच्या तरी दबावाखाली आणि कोणाला तरी फायदा होण्यासाठी युद्धबंदी जाहीर करण्यात आली असल्याचेही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर