जालना, 19 मे : जालना विधानसभा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे नुकतेच बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, बालाजी देवदर्शनात अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी ‘केशदान’ करत आपले पती आमदार होण्यासाठी बालाजीला बोललेला नवस फेडलाय.
नेमकी बातमी काय? –
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जालना विधानसभा मतदारसंघात कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. तत्पुर्वी विधानसभा निवडणूक 2019 साली अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभव झाला होता.
‘पती आमदार व्हावेत’ यासाठी बोलला नवस –
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गेली पाच वर्ष त्यांची संघर्षाची ठरली. ईडीचा ससेमिरा तसेच विरोधकांकडून आरोप आणि राजकीय कोंडीचे प्रयत्न या सगळ्या परिस्थितीतून अर्जुन खोतकर आणि त्यांचे कुटुंबिय जात होते. यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय व्हावा आणि ते पुन्हा एकदा आमदार व्हावेत यासाठी अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा यांनी बालाजीला नवस बोलला होता.
पती आमदार झाले अन् पत्नीने ‘केशदान’ करत फेडला नवस –
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खोतकर यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. यानंतर अर्जुन खोतकर हे आमदार झाल्यानंतर ते सपत्नीक बालाजीला गेले. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा यांनी ‘केशदान’ करून बालाजीला बोललेला नवस फेडला. यानंतर त्यांचे पती आमदार अर्जुन खोतकर हे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
आमदार अर्जुन खोतकर यांची फेसबूक पोस्ट –
तसेच आमदार अर्जुन खोतकर यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, नदीचं समुद्राला मिळणं म्हणजे समर्पण! सर्वस्वाचा त्याग म्हणजे समर्पण! पत्नीधर्माचं खरंखुरं पालन म्हणजेही समर्पण… आणि माझ्या दृष्टीने समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे “सीमा”. निशब्द… धन्यवाद सीमा….
मामासाठी भाच्याने देखील केला होता सौंदर्याचा त्याग –
अर्जुन खोतकर यांच्या भाच्याने देखील त्यांच्यासाठी प्रण केला होता. सौंदर्याचा त्याग करत तब्बल पाच वर्ष दाढी मिशासह डोक्यावरील केस वाढविले आणि आपले मामा आमदार झाल्यानंतर बालाजीला केसदान केले. याबाबत अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय की, मामा आणि भाचा हे नातं तसं रक्ताचच… पण ऐन तारुण्यात एक देखणा युवक मामाचा विजय व्हावा म्हणून सौंदर्याचा त्याग करत तब्बल पाच वर्ष दाढी मिशासह डोक्यावरील केस वाढवितो… प्रेमच ते! स्वप्नपूर्ती होताच योगेश नेही केसदान केले….. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच… तुझ्या अभिष्टचिंतनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…