जळगाव, 10 जून : जळगाव शहरात आज महावितरणच्या कंत्राटी वायरमनला लाच प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडत कारवाई केलीय. वीज मीटर बदलासंदर्भात वीज चोरीचा गुन्हा दाखल न होण्यासाठी कंत्राटी वायरमन भूषण चौधरीने लाच मागितली. दरम्यान, याबाबतची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाल्यानंतर सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जळगाव एसीबीचे उपधीक्षक योगेश ठाकूर यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
जळगाव एसीबीचे महत्वाचे आवाहन –
जळगाव एसीबीचे उपधीक्षक योगेश ठाकूर यांनी केलेल्या आवाहनानुसार, महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलुन त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम एन.सी.सी. या एजन्सी कडून विनामुल्य करण्यात येत आहे. त्यात नवीन स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर जुने वीज मीटर महाविरण कार्यालयात जमा करण्यात येतात. ज्युन्या वीज मीटर संदर्भात तकार नसल्यास जुन्या वीज मीटरची कोणत्याही प्रकारची टेस्टींग केली जात नाही. तसेच आर्थिक दंड आकारला जात नाही.
मात्र, महाविरणचे काही कर्मचारी हे वीज ग्राहकांना तुमचे मीटर फॉल्टी आहे, सील तुटलेले आहे, टेस्टींगला पाठवावे लागेल, दंड भरावा लागेल, तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल असे खोटे सांगुन वीज ग्राहकांकडुन मोठया प्रमाणात लाच घेत असल्याबाबत तपासात व नागरिकांनी ला.प्र.वि., कार्यालयाशी संपर्क साधून कळविले आहे.
तरी सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, आपल्या सोबत देखिल वरील प्रकारे लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे 02572235477 वर, टोल फ्री क्रमांक 1064 वर अथवा योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव यांना 9702433131 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Breaking : कंत्राटी वायरमनने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?