जळगाव, 9 जुलै : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने MA in Tribal Studies (ट्रायबल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी) आणि PG Diploma in NGO Management (एनजीओ व्यवस्थापन पदव्यूत्तर डिप्लोमा) असे दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
‘एम. ए. इन ट्रायबल स्टडीज’ अभ्यासक्रमाची सुरूवात –
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत आदिवासी अकादमी, नंदुरबार येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून MA in Tribal Studies (ट्रायबल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी) आणि PG Diploma in NGO Management (एनजीओ व्यवस्थापन पदवत्तर डिप्लोमा) दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या सामाजिक वास्तवाशी सुसंगत, अभ्यासातून कृतीकडे नेणारे व तरुणांना रोजगारक्षम शिक्षण देणारे आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून नंदुरबार येथे एम ए इन ट्रायबल स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. Tribal Research Knowledge Centre (TRKC), इंदोर यांच्या सहकार्याने तयार झालेल्या या अभ्यासक्रमात ट्रायबल हेल्थ अँड कम्युनिटी वेल बिंग ट्रायबल कल्चर (Tribal Health and Community Well-being Tribal Culture), लँग्वेज अँड हेरिटेज (Language and Heritage) नेचुरल रिसोर्सेस गव्हर्नन्स (Natural Resource Governance) या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
एनजीओ व्यवस्थापन पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमाचा देखील समावेश –
तसेच नंदुरबारसारख्या दुर्गम, आदिवासीबहुल जिल्ह्यात अनेक स्वयंसेवी संस्था, CSR प्रकल्प आणि शासनाच्या योजना कार्यरत आहेत. या योजनांची अंमलबजावणी आणि समाजाशी थेट संवाद साधणाऱ्या सक्षम तरुणांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. ही गरज लक्षात घेऊन PG Diploma in NGO Management हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन, निधी संकलन, शासकीय योजनांची अंमलबजावणी, समुदाय संवाद, डिजिटल रिपोर्टिंग, मूल्यांकन या बाबत तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. यामुळे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, फील्ड ऑफिसर, M&E असिस्टंट, CSR एक्झिक्युटिव्ह, सोशल मोबिलायझर अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच इच्छुक तरुणांना स्वतःची सामाजिक संस्था स्थापन करून सामाजिक उद्योजक बनण्याची संधीही या अभ्यासक्रमाद्वारे मिळणार आहे.
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांत करिअर करण्याच्या संधी –
महत्त्वाचे म्हणजे हे अभ्यासक्रम स्थानिक आदिवासी समाजाच्या आरोग्य, भाषा, संस्कृती, निसर्गाधारित उपजीविका, वनहक्क कायदे (FRA), पंचायत विस्तार कायदा (PESA) यांसारख्या मुद्द्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून संशोधन, नेतृत्व आणि धोरणनिर्मितीसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करून नंदुरबार जिल्ह्यासह आदिवासी बहुल भागात पारंपरिक जीवनपद्धती, बोलीभाषा, सामाजिक समस्या, आणि पर्यावरणीय संघर्ष यांचे दस्तऐवजीकरण, अभ्यास आणि कृतीत रूपांतर ही या अभ्यासक्रमाची केंद्रबिंदू आहेत. विद्यार्थ्यांना ITDP, TRTI, वनविभाग, ग्रामपंचायती, संशोधन संस्था, सामाजिक संस्था, CSR प्रकल्प, माध्यम, संग्रहालये अशा अनेक क्षेत्रांत करिअर संधी खुल्या होणार आहेत.