मुंबई, 11 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. असे असताना हे अधिवेशन आणखी तापण्याची शक्यता आहे. कारण, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ते त्यांच्या रूममध्ये बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्या रूममधील पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल झालाय.
‘मंत्र्याच्या रूममधील पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल’ –
मंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या रूममध्ये पैशांच्या बॅगेचा शेजारी बसले असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचे दिसून येतंय. दरम्यान, यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया देत राऊतांवरच जोरदार टीका केली आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओवर मंत्री संजय शिरसाट यांचा खुलासा –
व्हायरल व्हिडिओवर मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मित्राकडून तो व्हिडिओ मी नुकताच पाहिला. त्यामध्ये दाखवलेली जागा म्हणजे माझंच घर आहे. ती माझी बेडरूम असून त्या व्हिडिओमध्ये मीच त्या खोलीत बसलेलो आहे. आणि त्या खोलीत माझा लाडका कुत्राही बाजूलाच आहे. त्यामुळे या व्हिडिओबाबत मला काहीही आश्चर्य वाटत नाही. यात काहीही गैर वाटण्यासारखं नाही.
View this post on Instagram
दरम्यान, केवळ मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात असून त्या व्हिडिओमध्ये एक बॅग दिसत आहे. पण, एवढी मोठी बॅग जर पैसे ठेवण्यासाठी वापरण्याची गरज असती, तर मग घरातली अलमारी काय मेली होती? त्या बॅगेत पैसे नाहीत, तर कपडे आहेत, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला.
मंत्री शिरसाट यांची राऊतांवर जोरदार टीका –
मंत्री संजय शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आजही ठरवूनच वक्तव्य केलं. शिंदे साहेब दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आणि सांगितलं की जर माझा पक्ष लागला, तर त्याला विलीन करा. पण मला मुख्यमंत्री करा. हे सगळं पाहिल्यावर प्रश्न पडतो – यांना संताजी-धनाजी दिसतात का? त्यांची विधाने म्हणजे मूर्खपणाचं प्रतीक वाटतात. सकाळी उठल्यानंतर एकनाथ शिंदे, दुपारी एकनाथ शिंदे, मेळावा असेल तर एकनाथ शिंदे, झोपतानाही एकनाथ शिंदे – संजय राऊतांचं सगळं लक्ष एकनाथ शिंदे यांच्यावरच केंद्रित आहे. दरम्यान, गेलेली सत्ता त्यांना शांत बसू देत नाही, असेही मंत्री शिरसाट म्हणाले.