चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 19 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2025 काल 18 जुलै रोजी संस्थगित करण्यात आले. दरम्यान, या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील चौथ्या दिवशी जळगाव जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा मुद्दा गाजला. यासोबतच अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा उपस्थित करत पीआय बबन आव्हाड यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यातील तीन आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 17 जुलै गुरूवार रोजी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी विधानसभेत बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात 23 जानेवारी 2025 रोजी एक अंमली पदार्थाप्रकरणी शहर पोलिसांनी छापा मारला. तिथे सर्फराज भिस्ती नावाच्या व्यक्तीच्या घरी 53 ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली. त्यामध्ये आरोपीच्या घरी कारवाई केली तो एक आरोपी, दुसरा अन्सार, याकूब आणि यासिन अशा चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अबरार शेख हा मुख्य डीलर आहे. तो फरार आहे.
अंमली पदार्थाची तस्करी विरोधात आमदार आक्रमक –
या घटनेत सरकारच्या वतीने उत्तर देताना स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय पोटे हे या अबरार शेखच्या सतत संपर्कात होते. एमडी सारख्या ड्रग्स प्रकरणात, इतक्या गंभीर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय आरोपीच्या संपर्कात होते, असे सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. याठिकाणी अंमली पदार्थाची तस्करी केली जाते, गुटख्याची तस्करी केली जाते.
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघडली आहे की, जळगाव जिल्ह्यात 36 खून झाल्याची माहिती आता दिली आहे. एका बालकाचा नरबळी दिला गेला. एका महिलेचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कोण चालवत आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कॉल रेकॉर्ड्स जर चेक केले तर 53-53 कॉल त्यामध्ये सापडले असते आणि ते स्थानिक गुन्हे शाखेला काम करत आहेत.
बबन आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर ठेवले बोट –
हा आव्हाड नावाचा पीआय जो स्थानिक गुन्हे शाखेला होता, हा जळगाव जिल्ह्यात आल्यावर बाजार पेठ पोलीस स्टेशनसारख्या जळगाव जिल्ह्यातील अतिशय प्राइम लोकेशनवर बसतो. बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 23 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. याठिकाणी बबन आव्हाड कार्यरत असताना हेही घटना दाबली जाते. पोलीस कधी या प्रकरणांची चौकशी करणार का, असा सवालही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
तसेच पुढे बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज गुटख्याच्या तस्करीसंदर्भात 2025 च्या पूर्ण वर्षात 25 कारवाया केल्याची माहिती यावेळी दिली गेली. हा जिल्हा सीमावर्ती भागात असल्याने कायदा आहे की नाही, याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते, पोलीस अधिकारी यात समाविष्ट आहेत.
पोटे ज्या पोलीस स्टेशनला होते, ज्या एलसीबी शाखेला होते, तेथील पीआय जे आहेत, ते पण याप्रकरणात आरोपी होते. 53 कॉल त्याचे आरोपीसोबत झाले होते. तर पोटेला त्यात सहआरोपी करावे, फक्त निलंबित करुन चालणार नाही. तसेच पीआय आव्हाड यांनाही निलंबित करण्यात यावे. त्यांना निलंबित करणार का, असा सवाल त्यांनी केला.
जळगाव जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा मुद्दा –
पुढे बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, किशोर आप्पांच्या पाचोरा मतदारसंघात एकाला खून करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात आहे का, जळगाव पोलीस अधीक्षकांना याबाबत जाब विचारला जाणार आहे का, तसेच या दोन्ही पीआय, आव्हाड आणि पोटे या दोघांना आरोपी करुन त्यांची चौकशी होणार आहे, का, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
जळगावच्या गुन्हेगारीवर आमदार किशोर आप्पा काय म्हणाले? –
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षवेधीवरून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील जळगाव जिल्ह्याच्या गुन्हेगारीबाबत मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, एक वर्षापुर्वी डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत एसपी, कलेक्टर तसेच पालकमंत्री हे सर्व होते. या बैठकीत मी सांगितले की, मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेला हा जळगाव जिल्हा असून सध्याच्या परिस्थितीत अनेक रिव्हॉल्वर तस्करी केली जात आहेत. दरम्यान, जर एका वर्षापुर्वी गावठी कट्टे जिल्ह्यात येत आहेत, असं जर एखादा आमदार सांगत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहेत?, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात 11 गोळ्या झाडून तरूणाची निर्घूण हत्या झाली. तरी देखील पोलिसांची कुठलीही कारवाई अवैध कट्ट्यांबाबत झाली नाही, असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली पीआयच्या निलंबनाची मागणी –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, ज्यावेळी पुराव्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे की, पोटेंचे 153 फोन कॉल आरोपींबरोबर झाले. अध्यक्ष महोदय केवळ निलंबन करून चालणार नाही तर थेट जेलमध्ये टाकण्याची कारवाई पोटेंवर झाली पाहिजे. एखादा एपीआय पीआयच्या अंतर्गत काम करत असताना ते त्या एपीआयचे आरोपीबाबत 153 कॉल होत असतील तर त्या पीआयच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. पीआयला हाच एपीआय हप्ते जमा करून देत होता, हे आम्हाला 100 टक्के माहितीये. पोलीस पोलिसांची चौकशी करत असताना त्याला कधीही दोषी ठरवणार नाही. पीआयची चौकशी नव्हे तर आव्हाड यांच्यावर आजच्या आज निलंबन करण्यात यावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
अमळनेरचे आमदार अनिल पाटील काय म्हणाले? –
अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी देखील चंद्रकात पाटील यांच्या लक्षवेधीवरून तात्काळ पीआय बबन आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली. आमदार अनिल पाटील म्हणाले की, पोटेला निलंबित केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया केली जातेय. मात्र, त्याच्या पाठीमागे सूचना देणाऱ्यावर आजच्या आज कारवाई करणार का?, कारण पोटेच्या पाठीमागे त्याचा वरिष्ठ अधिकारीच होता त्यामुळे निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. तसेच अंमली पदार्थातील मुख्य आरोपी अब्रान जिलानीच्या सगळ्या सूत्राधारांपर्यंत पोलिसांची कारवाई होणार? का असा सवाल उपस्थित केला.
अंमली पदार्थ तस्कारी प्रकरणावर गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्वाची माहिती –
राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले की, पोलिसांनी स्वतः छापा टाकून 23 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपींना अटक करण्यात आली आणि आजही ते आरोपी न्यायलयीन कोठडीत आहेत. तसेच तपासाच्या दरम्यान एपीआय दत्तात्रय पोटे यांचे काही कॉल एका आरोपीशी जुळत होते. म्हणून पोटेंना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री या विषयासंदर्भात अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्यानुसार, पोटेंची स्वतंत्र चौकशी करून त्या प्रकरणात त्यांचा सहभाग आढळला तर त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात येईल.
बबन आव्हाड यांची होणार चौकशी –
दरम्यान, पोटेंना निलंबित केले पण आव्हाडला का निलंबित केले नाही, असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केल्यामुळे मंत्री पंकज भोयर म्हणाले की, आता आव्हाड यांची ज्यावेळी पोलीस चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून आलेला नाहीये. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मागणीची दखल घेऊन पुन्हा आव्हाड यांची चौकशी केली जाईल आणि यामध्ये ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.
दोषी आढळल्यास आव्हाड यांच्यावर केली जाईल कारवाई –
दत्तात्रय पोटे यांना सर्वप्रथम निलंबन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करींसदर्भात सखोल चौकशी करून पोलिस यंत्रणेतील असतील किंवा बाहेरचे असतील त्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सभागृहात सांगितले. अंमली पदार्थ प्रकरणानंतर पीआय बबन आव्हाड यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच पुढील आठ दिवसांच्या आत चौकशी करून ते जर दोषी आढळले तर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असेही मंत्री भोयर यांनी स्पष्ठ केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता गृहविभागाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील तीन आमदार पीआयच्या निलंबनासाठी आक्रमक –
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत बबन आव्हाड यांची तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी तिघं आमदारांच्या मुद्दे समजून घेतली. पुढील आठ दिवसांच्या आत आव्हाड यांची चौकशी करून ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ठ केले.
कोण आहेत बबन आव्हाड? –
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पीआय किशन नजन पाटील हे मागील वर्षी गेल्या ३१ मे रोजी निवृत्त झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक निकम यांच्याकडे होता. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी 12 जून 2024 रोजी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार सोपविला होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्याचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार 2 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.