बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने न्यायालयात दोषमुक्तीसाठी विनंती अर्ज केला होता. न्यायालयातील या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आज बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर आता खंडणीसह खूनाचही खटला सुरू राहणार आहे. याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली.
याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातून मला दोषमुक्त करावं, अशा मागणीचा अर्ज दिला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्याचा अर्ज फेटाळल्यावर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींना आम्हाला या खटल्यातून वगळावं, दोषमुक्त करावं, असा अर्ज दिला.
आरोपींच्या या मागणी अर्जावर उज्ज्वल निकम यांनी जोरदार हरकत घेतली. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे. आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज केल्यानंतर परत दुसऱ्याने, तिसऱ्याने करायचा, अशा रितीने वेळेचा अपव्यय करायचा, खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे.
त्यामुळे जर त्यांना दोषमुक्त अर्ज करायचा असेल तर सर्व आरोपींनी एकाच वेळी करावा, अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला केली. त्याप्रमाणे विष्णू चाटेपासून एकूण 7 आरोपी आहेत, त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केला. त्यात या सर्व अर्जांना खुलासा देण्यात आला आहे. वाल्मिक कराडने जामिनावर आपली मुक्तता करण्यात यावी, असाही अर्ज दिलेला आहे. त्यावरही आम्ही आमचं म्हणणं देत आहोत. त्यालाही आम्ही विरोध करत आहोत.
न्यायालयाने त्याच्यावर कोणते आरोपपत्र दाखल करावे, याकरिता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टात आज न्यायालयात ड्राफ्ट 4 दिलेला आहे आणि आरोपी वाल्मिक कराड व त्याचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली 12 ते 13 आरोप निश्चित करण्यात यावेत, अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केलेला आहे. या अर्जाची सुनावणी, आरोपीने दोषमुक्तीचा अर्ज दिला आहे तो डिसाईड ज्यावेळेला होईल, त्यावेळी त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल.
यानंतर एकदा न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित केले की मग खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. आरोपी विष्णू चाटे व इतर आरोपींनी जो दोषमुक्तीचा अर्ज दिला आहे. तो विलंबाने न्यायालयात दिला आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत करायला हवा होता. त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही. विलंबमाफीचा अर्ज देखील केलेला नाही. म्हणून न्यायालयाने तडकाफडकी त्यांचे अर्जे फेटाळून लावले, अशा तऱ्हेचीही आम्ही मागणी केलेली आहे. आता पुढची सुनावणी ही 4 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.