पणजी, 8 ऑगस्ट : गोवा सरकारने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलत, समाजातील वंचित घटकांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी दोन महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ केला. आदिवासी (ST) आणि अनुसूचित जाती (SC) समुदायांसाठी माहिती व संवाद तंत्रज्ञानावर आधारित सशक्तीकरण योजना आणि महिला डिजिटल सशक्तीकरण योजना या दोन उपक्रमांचा प्रारंभ पणजीतील PAC येथे झाला.
या योजनांचा उद्देश म्हणजे तांत्रिक ज्ञान आणि डिजिटल साधनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनांचा मुख्य हेतू आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, या योजनांमधून समाजातील मागास घटकांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येक गोमंतकीयाला डिजिटल संधीचा लाभ मिळावा, यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. ग्रामीण भागात सुरू होणारी ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजना स्थानिकांना रोजगार देईल आणि पर्यटकांना गोव्याच्या अंतरंगाशी जोडेल. स्वयंपूर्ण गोवा ही आता संकल्पना नसून कृती आहे.
या ऐतिहासिक दिवशी गोव्याच्या शिरपेचात दोन राष्ट्रीय पुरस्कारांची मानाची भर पडली. दिल्लीत ले मेरिडियन हॉटेलमध्ये आयोजित 10 व्या इंटरनॅशनल टुरिझम एक्स्पो, कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्ड्स (ITCTA) मध्ये गोव्याला सर्वोत्तम कौटुंबिक पर्यटनस्थळ म्हणून गौरवण्यात आले. याच दिवशी ताज पॅलेस, नवी दिल्ली येथे झालेल्या Wed In India 2025 Awards मध्ये गोव्याला सर्वोत्तम रिसॉर्ट वेडिंग डेस्टिनेशन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.