जळगाव, 7 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला बळकटी देणाऱ्या पाडळसरे धरण प्रकल्पास (निम्न तापी प्रकल्प) केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) अखेर समाविष्ट झाला असून केंद्र शासनाने 859 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे अधिकृत अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अमलबजावणीला गती मिळून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला यापूर्वीच PIB मान्यता प्राप्त झाली होती. मात्र, PMKSY योजनेतील समावेशामुळे निधी वितरण, प्रशासकीय मंजुरी आणि काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस आता अधिकृत वेग मिळणार आहे.
खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश –
पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट करण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. खासदार झाल्यापासून त्यांनी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध पातळ्यांवर पाठपुरावा करताना, लोकसभेतही यासंदर्भात आवाज उठवला. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील साहेब, अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांशी त्यांनी थेट संपर्क साधला.
जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र विस्ताराला चालना –
पाडळसरे धरण प्रकल्पाच्या या निधी मंजुरीबद्दल प्रतिक्रिया देताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, पाडळसरे प्रकल्पाच्या PMKSY योजनेतील समावेशामुळे केवळ निधी मंजूर झाला नाही, तर जळगाव जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा व नवसंजीवनी ठरणार आहे. दरम्यान, पाडळसरे प्रकल्पामुळे तापी नदीच्या पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर करता येणार असून, हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेती उत्पादनात वाढ, पीक विविधीकरण, व आर्थिक स्थैर्य साधण्यास मोठा आधार मिळेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासालाही गती मिळेल.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.
हेही वाचा : पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम