पणजी, 14 ऑगस्ट : सत्यकुमार मोहन संचेती एसएमएस ग्रुप्स, फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड सामान्य धोकादायक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (CHWTSDF) गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (GWMC) आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) यांच्या सहयोगाने सत्तरी, पिसुर्ले औद्योगिक वसाहत येथे उभारण्यात आलेल्या प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 14 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमात मनोगत मांडताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, एसएमएस ग्रुपने पुढील 100 वर्षांसाठी सार्वजनिक, खाजगी भागीदारीतून 125 कोटींहून अधिक खर्च केला आहे. या निधीचा वापर धोकादायक कचरा प्रक्रिया करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व कंपन्यांनी त्यांचा धोकादायक कचरा फक्त ‘पीईएल’ला द्यावा आणि कचरा प्रक्रिया करण्याचा इतर कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नाही तसेच अनावश्यक प्रक्रिया केल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्थात यावर गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन त्यावर लक्ष ठेवणार आहे.
हे काम नक्कीच यशस्वी होणार असून शरद काळे सारखे तज्ज्ञ यात सहभागी असल्याने या प्रक्रियेत प्लांट लगत रहाणाऱ्या लोकांवर कोणताही विपरित परिणाम होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. कचऱ्याची विल्हेवाट ही गोव्यात आता समस्या राहिलेली नाही. सरकारी पातळीवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून कचऱ्यातून राज्याची सुटका करण्यासाठी सरकारचे सतत प्रयत्न सुरू असतात. पिसुर्ले ग्रामपंचायतीच्या स्थानिकांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि समस्या सोडवण्यासाठी मी वचनबद्ध असून स्थानिकांना या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.
गोवा राज्यसरकार भारत सरकारसोबत कचरा व्यवस्थापनाबाबत ज्ञान भागीदारी करत आहे. गोव्यातील आमचे घनकचरा व्यवस्थापन या कचऱ्याचे संपत्ती आणि स्वच्छ उर्जेमध्ये रूपांतर करत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्येच्या आमदार देविया राणे, माजी खासदार राज्यसभा अजय संचेती, कचरा व्यवस्थापन विभागाचे सचिव महेश कुमार शंभू, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक हरीश आडकोणकर, पद्मश्री डॉ. शरद काळे, विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाचे संचालक डॉ. स्नेहा गित्ते, पीईएल अध्यक्षल परम संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.