ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 जुलै : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून अपघाताची एक घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज मंगळवारी सकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नेमकं काय घडलं –
बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना आज पाचोरा तालुक्यात घडली. ही बस सातगाव डोंगरी येथून पाचोरा येथे येत होती. यावेळी एसटी बस (क्रमांक MH14 BT 1618 ) आणि ट्रकची (क्रमांक MH19 CY 7521) समोरासमोर धडक झाली. मोंढाळा आणि पाचोऱ्याच्या दरम्यान साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात सातगाव डोंगरी, वाडीशेवाळे येथील जवळपास 15 शाळकरी मुले किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पाचोरा येथे हलवण्यात आले आहे. सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही.
ही बस सातगाव डोंगरी येथे मुक्कामी होती. आज सकाळी ती प्रवाशांसह पाचोराकडे जायला निघाली असताना मोंढाळा आणि पाचोऱ्याच्या दरम्यान कारखान्याजवळ या एसटी बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर यानंतर अपघातस्थळी पंचनामा करण्यात आला असून गाडी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. तसेच पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती मिळाली आहे.