मुक्ताईनगर, 18 सप्टेंबर : मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावातील रहिवासी किरण मधुकर सावळे या व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज 18 सप्टेंबर रोजी मयत सावळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. या भेटी प्रसंगी पालकमंत्री यांनी शासनातर्फे आर्थिक मदत म्हणून मयत किरण सावळे यांच्या कुटुंबाकडे चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुऱ्हा गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोरक्ष गंगा नदी काठ, बाजार परिसरास भेट देऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. कुऱ्हा शिवारात, मका, कापूस, सोयाबीन या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यात येईल असे सांगितले. तालुक्यातील,जुने बोरखेडा, राजुर, चिंचखेडा गावामध्ये सुद्धा पालकमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शासन मदतीसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे –
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मी तुमच्या मदतीसाठी येथे आलो आहे. शासन मदतीसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी संबंधित गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही पाहा : Video | शेतकरी जनआक्रोश मोर्चा; जळगावात अॅड. विश्वासराव भोसले यांचे जोरदार भाषण