भुसावळ, 15 सप्टेंबर : महसूल व वनविभागाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभर सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील लोणारी मंगल कार्यालय येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवा पंधरवाडा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नागरिकांना थेट व सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते, भुसावळ तहसिल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, तहसिलदार निता लबडे , मुख्याधिकारी नगरपरिषद राजेंद्र फातले उपस्थित होते.
सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत भुसावळ तालुक्यातील एकूण 21 शासकीय विभागांमधील 253 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच 998 नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा याचा लाभ घेतला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांनी महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, पोलीस, सामाजिक न्याय, कृषी आदी विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.