मुंबई, 25 सप्टेंबर : महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना दिले.
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. पूरग्रस्तांना ‘एनडीआरएफ’मधून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे.
दिवाळीपुर्वी सगळ्या शेतकऱ्यांना मदत –
आपत्ती व्यवस्थापनाचे नियमांमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्या असून त्याप्रमाणेच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वीच मदत केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले. याआधी नुकसानीचे पंचनामे शासनाकडे आल्यानंतर सहा-सहा महिन्यांनी मदत दिली जायची. मात्र, यावेळेस ज्या-ज्या भागातील पंचनामे शासनास प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना मदत दिली जात आहे. राज्य शासनाच्यावतीने कालच 2200 कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून दिवाळीपुर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
View this post on Instagram
मुख्यमंत्री ओला दुष्काळबाबत काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ म्हणजे ही बोलीभाषा आहे. दुष्काळाचे जी संकल्पना आहे त्यामध्ये ओला दुष्काळ अशाप्रकारची कुठलीही व्यवस्था नाही. साधारण दुष्काळाच्या काळात ज्या काही योजना तसेच सूट राबवितो. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ सोडून सर्व योजना याठिकाणी राबविल्या जातील. त्यामध्ये सर्वात प्रमुख बाब ही विजेच्या बिल स्थगित केले जाते.
मात्र, आता राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना वीजबील माफी करण्यात आली आहे. त्यामुळे वीजेचे बिल घेण्यात येणार नाही. दरम्यान, याव्यतिरिक्तही टंचाईच्यावेळी ज्या काही योजना आपण लागू करतो असा त्याचा अर्थ आपण घेऊ या आणि ते आम्ही करणार असल्याचे स्पष्ठीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.