ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.), 29 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर पोलीसांनी गुटख्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पिंपळगांव हरेश्वरमधील गायत्री किराणा दुकानातील प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी जप्त करत एकास अटक केलीय. श्रीकृष्ण भगवान क्षिरसागर (वय 46, रा. पिंपळगांव हरेश्वर) असे त्याचे नाव असून याप्रकरणी पिंपळगाव हरे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
पिंपळगांव हरेश्वर पोलीसांना गायत्री किराणा दुकानातील मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुकानातील माल तपासला.
दरम्यान, पोलीसांनी आरोपी श्रीकृष्ण भगवान क्षिरसागर (वय ४६, रा. पिंपळगांव हरेश्वर) यांच्या ताब्यातून एकूण 2 लाख 41 हजार 836 रुपये किंमतीचा पानमसाला व तंबाखू माल जप्त केला. हा माल चोरटी विक्रीसाठी ठेवल्याने पिंपळगांव हरे पोलीस स्टेशनला भाग-5 गुरनं-284/2025 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (1), 26 (2) (iv), 27 (2) (c) (d), 27 (3) (d) (e), 3 व 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई –
सदरची कार्यवाही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, ग्रेपोउपनि प्रकाश पाटील, पोहेकॉ तात्याबा नागरे, पोना पांडुरंग जगन गोरबंजारा यांनी केली. पुढील तपास पोउनि विठ्ठल पवार हे करीत आहे.






