चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 13 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज 13 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलंय. दरम्यान, गटनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बांबरूड-कुंरगी गटात सर्वसाधारण आरक्षण –
पाचोरा तालुक्यातील बांबरूड-कुरंगी गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालंय. राज्यात 2017 साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या बांबरूड-कुरंगी गटात निवडणुकीत शिवसेनेचे पदमसिंह पाटील यांचा विजय झाला होता आणि पाच वर्षांपासून ते गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत होते. दरम्यान, मागील निवडणुकीत बांबरूड-कुरंगी गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने यावेळेस आरक्षण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बांबरूड-कुंरगी गटात सर्वसाधारण हे आरक्षण कायम राहिलंय.
बांबरूड-कुरंगी गटात मोठी चुरस –
पाचोरा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर बांबरूड-कुरंगी गटात शिंदे सेनेचा उमेदवार उभा राहणार हे स्पष्ट आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यापैकी नेमका कोणता उमेदवार उभा राहतो तसेच महाविकास आघाडीच्या वतीने कोण रिंगणात राहील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर बांबरूड-कुरंगी गटात मोठी चुरस पाहायला मिळू शकते.
बांबरूड-कुंरगी गटात इच्छुक उमेदवार –
बांबरूड-कुंरगी गटात माजी जि. प. सदस्य पदमसिंह पाटील हे पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असून येत्या काही दिवसात ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच अस्मिता पाटील यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून बांबरूड-कुंरगी गटातून त्या उमेदवारीसाठी दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे हे त्यांच्या कुटुंबातून त्यांची आई आशाबाई भिकन तावडे यांची उमेदवारी जाहीर होण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपुर्वी भाजपात प्रवेश केलेले माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांनी बांबरूड-कुंरगी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
युती-आघाडीच्या निर्णयानंतर निवडणुकीचे गणित स्पष्ठ होणार? –
राज्यात महायुती असो की महाविकास आघाडी यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती-आघाडीबाबत अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये. यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर युती-आघाडी किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा कधी होते आणि कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.