जळगाव, 14 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. वाळूचे डंपर चालू देण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांना प्रत्येकी महिन्याला 73 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून 73 हजार रुपये लाच घेताना खाजगी इसमासह तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली.
काय आहे संपूर्ण घटना –
यातील तक्रारदार यांचे वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. यातील तक्रारदार यांनी आरोपी खाजगी पंटर शिवदास कोळी याला फोन केला असता त्याने तक्रारदार यांना भुसावळ येथुन डंपरद्वारे वाळु वाहतुक करु देण्यासाठी आप्पा व कोतवाल जयराज भालेराव यांचे नाव सांगुन दरमहा 73 हजार रुपये लाचेची मागणी केली, अशी तक्रार ला.प्र.वि. जळगांव यांच्याकडे 15 सप्टेंबर रोजी दिली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने 15 सप्टेंबर रोजी आरोपी शिवदास कोळी याची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्याने तक्रारदार यांचा वाळूचा डंपर चालू देण्यासाठी तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला 73 हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल, असे सांगितले.
यावेळी आरोपी तलाठी नितीन केले व आरोपी कोतवाल जयराज भालेराव यांची आरोपी शिवदास कोळी याच्या मोबाईल फोन वरुन पडताळणी केली असता त्यांनी लाचमागणीस प्रोत्साहन दिले. त्यानंतर काल 13 ऑक्टोबर रोजी आरोपी शिवदास कोली याने तक्रारदार यांच्याकडून 73 हजार रुपयांची लाच रक्कम स्वतः स्विकारली असता त्याला सापळा पथकाने रंगेहात पकडले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी तलाठी नितीन केले यांच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता त्यात 1 लाख 65 हजार रुपये रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचे 2 मोबाईल, आरोपी कोतवाल यांच्या अंगझडतीत वन प्लस कंपनीचा मोबाईल व आरोपी शिवदास कोळी याचे अंगझडतीत लाचेची रक्कम 73 हजार रुपये रोख या व्यतिरीक्त 86 हजार रुपये इतर रोख रक्कम मिळून आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी तलाठी, कोतवाल आणि खासगी पंटर या तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील आणि सुरेश पाटील, पो. ना. बाळू मराठे, पोलीस कॉ. राकेश दुसाने, प्रणय ठाकूर भूषण पाटील यांनी यशस्वीरित्या केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.