नाशिक, 10 नोव्हेंबर : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असाव्यात, अशा सूचना मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिल्या आहेत.
मुख्य सचिव राजेश कुमार दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा विकास कामे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, दर्शन मार्गिका, नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, मंदिराचे विश्वस्त यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेशकुमार यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उपलब्ध असलेली जागा व भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन करणे आवश्यक आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच साधू, संत, महंत आणि भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा वेळेत उपलब्ध होतील. तसेच आरोग्याच्या पुरेशा सुविधा व आपत्ती निवारणाची सुविधा त्याचबरोबर विविध बाजूंनी त्र्यंबकेश्वरकडे येणा-या रस्त्यांचे मजबुतीकरण, पार्किंगसाठी लागणाऱी जागा, नदी किनारी बांधण्यात येणारे घाट आदि कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येणारी कामे वेळेत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
यावेळी कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सुरू असलेली कामे, नियोजित कामे, कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येत असलेले नियोजन आदींबाबत विभागीय आयुक्त डाॅ. गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.






