मालेगाव, 20 नोव्हेंबर : मालेगाव प्रकरणातील चिमुरडीचा आरोपी समोर आला तर कापून काढू, अशी आमची तीव्र भावना आहे. मात्र, पोलीस अधिकारी सर्व काम करताएत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून त्यांनी नाशिकचे एसपी बाळासाहेब पाटील यांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणात आणखी पुरावे मिळण्यासाठी डीवायएसपी तपास करत आहेत.
दरम्यान, येत्या दिवसांमध्ये चार्जशीट लवकरच दाखल केली जाईल. तसेच केस स्ट्राँग करण्यासाठी सबळ पुरावे देखील पोलिसांच्या माध्यमातून समोर येतील आणि या हरामखोन सैतानाला फाशीच होईल, असा विश्वास विधान परिषद आमदार तथा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
चित्रा वाघ यांनी घेतली कुटुंबीयांची भेट –
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केल्याची घटना रविवार 16 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे येथे येऊन पीडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. कुटुंबीयांनी चित्रा वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करत हंबरडा फोडला. यावेळी घरातील विदारक परिस्थिती पाहून चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले होते.
‘आरोपीला फाशीच होणार!’ –
तीन-साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झाला. कुठल्या शब्दाने सांत्वन करू. या घटनेमुळे प्रत्येक आईचे काळीज रडत असेल. अत्याचार करुन राक्षसी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली असून अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याला मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे. पालक म्हणून आपणही जागरूक राहणे आवश्यक असून आरोपीला फाशीच होणार, हा देवा भाऊंच्यावतीने मी शब्द देते, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.






