नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने पुन्हा एकदा देशाचा अभिमान उंचावला आहे. जगातील आठव्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंच पर्वत माऊंट मनास्लू (8,163 मीटर) सर करून तिने भारतीय तिरंगा फडकावला. कठीण हवामान आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक चढाई पार करताना तिला तब्बल 16 तासांचा कालावधी लागला होता.
दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन (IMF) या देशातील सर्वोच्च गिर्यारोहण संस्थेने दिल्लीत आयोजित समारंभात प्रियांकाला सुवर्णपदक प्रदान केले. उच्च-उंचीवरील धोकादायक आणि जटिल चढाईत केलेल्या अपवादात्मक प्रयत्नांची नोंद म्हणून हा सन्मान दिला जातो.
सातार जिल्ह्यातील पहिली खेळाडू –
प्रियांकाच्या या यशाने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून गिर्यारोहणातील सुवर्णपदक मिळविणारी ती जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीचे महाराष्ट्रासह देशभरातून कौतुक होत आहे. अत्यंत कठोर परिश्रम, धैर्य आणि चिकाटीसाठी ओळखली जाणारी प्रियांका मोहिते ही आज देशातील प्रेरणादायी गिर्यारोहकांपैकी एक मानली जाते. 8 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची शिखरे सर करणे हे जगभरातील फार थोड्याच गिर्यारोहकांना साध्य होते. प्रियांकाचा हा प्रवास तिच्या अदम्य इच्छाशक्तीचे द्योतक आहे.
तिचा गिर्यारोहण प्रवास सह्याद्रीत सुरू झाला, आणि तेथून पुढे तिने जगातील काही सर्वाधिक कठीण शिखरांवर पाऊल ठेवले. 2013 मध्ये ती माउंट एव्हरेस्ट (8,848 मी.) सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला ठरली. त्यानंतर तिने 2018 मध्ये लोहत्से (8,516 मी.), 2019 मध्ये मकालू (8,485 मी.) आणि 2021 मध्ये अत्यंत धोकादायक अन्नपूर्णा 1 (8,091 मी.) शिखर सर केले. 2023 मध्ये कांचनजंगा (8,586 मी.) आणि 2024 मध्ये माऊंट मनास्लू सर करत तिने नवे पर्व गाठले.
आतापर्यंत प्रियांकाने 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची जगातील 14 शिखरेपैकी सहा शिखरे सर केली असून हे कोणत्याही गिर्यारोहकासाठी अत्यंत दुर्मिळ आणि उल्लेखनीय यश आहे. सातत्याने उच्च-जोखीम असलेल्या आव्हानांना सामोरे जाऊनही तिचा संकल्प अधिक दृढ होत चालला आहे.
प्रियांकाच्या गिर्यारोहण प्रवासाला मिळालेल्या मानाचं प्रतिबिंब तिच्या पुरस्कारांतही दिसते. 2019 मध्ये तिला शिवछत्रपती राज्य साहसी पुरस्कार, तर 2022 मध्ये भारत सरकारतर्फे देशातील सर्वोच्च साहसी सन्मान तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिची कर्तबगारी केवळ वैयक्तिक विजय नसून संपूर्ण देशातील तरुण गिर्यारोहक—विशेषतः मुलींना—प्रेरणा देणारी ठरली आहे.






