जळगाव, 1 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींच्या एकुण 452 जागांसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून आज सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हयातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीसाठी सर्व मतदान प्रथके आवश्यक त्या साहित्यासह मतदान केंद्रावर पोहचले आहेत. या निवडणूकीसाठी एकूण ५७८० निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हयात 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीसाठी होणा-या मतदान प्रक्रियेसाठी एकुण 967 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून जिल्हयात एकूण 8 लाख 89 हजार 914 इतके मतदार मतदानाचा हक्क् बजावणार आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 4 लाख 50 हजार 893 इतकी असून महिला मतदारांची संख्या 4 लाख 38 हजार 938 इतकी आहे तर 83 इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्हयात एकुण 12 अपिल असलेल्या नपा सदस्य पदांची निवडणूक ही पुढे ढकल्याण्यात आली असून यात भुसावळ नगरपरिषदेतील 3, अमळनेर नगरपरिषदेतील 1, पाचोरा नगरपरिदेतील 2, यावल नगरपरिषेदतील 1, वरणगाव नगरपरिषेदतील 2, सावदा नगरपरिषेदतील 3 यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण 967 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मतदारांना शांततेत, व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






