छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर : शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारे आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला. समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
तापडिया नाट्यमंदिर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांच्यासह राज्यभरातील आयडॉल शिक्षक म्हणून निवड झालेले शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राष्ट्र प्रथम हा शिक्षण पद्धतीचा गाभा आहे, त्या दृष्टीने शासकीय शाळांमध्येही मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासन सातत्याने काम करत आहे. त्यादृष्टीने पीएमश्री योजनेच्या धर्तीवर राज्यातही सीएमश्री योजनेच्या माध्यमातून 5 हजार शाळांच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. नुकतेच युपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले जवळपास 60 टक्के उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतून शिकलेले आहेत, शासकीय शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते हे यावरून पहावयास मिळते.
दरम्यान, गरीब विद्यार्थी शिकला तर त्यांच्या कुटुंबाचीही प्रगती होते त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण देण्यावर आपला भर असणार आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याचा दृष्टीने शिक्षक भरतीमध्ये कला व क्रीडा शिक्षक भरतीस प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकविला जावा यासाठी केंद्राकडे मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या शासनाच्या योजनांची माहिती, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती संबंधित विद्यार्थ्यांपर्यत तसेच त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करावा. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. शाळांमध्ये वर्षभरात विविध उपक्रमांबाबत राबविण्याबाबत शासन निर्णय जाहिर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम हे शिक्षकांच्या माध्यमातूनच होत आहे. एक शिक्षक जर बदल घडवू शकतो तर सर्व शिक्षक एकत्र आले तर मोठा बदल घडवू शकतात. अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढली आहे. 1 हजार शाळांमध्ये एआय लॅब सुरू करण्याचा निर्णय झाला असून लवकरच याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भविष्यात संशोधक विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये वेळोवेळी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह (ता.जिवती) गावातील, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला सुस्थितीत आणून व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आदर्श निर्माण केला असे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी , गडचिरोली येथील शिक्षक खुर्शिद शेख, नाशिक जिल्ह्यातील हिवाळी (त्र्यंबकेश्वर) गावातील केशव गावित, तर पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर खेड येथील वाबळेवाडी शाळेचे वारे गुरूजी या आयडॉल शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Video | नगरपालिका निवडणुकीचा निकाल ज्यांच्या याचिकेमुळे पुढे गेला, त्या सचिन चुटे यांची विशेष मुलाखत






