जळगाव, 19 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जामनेरमधील 30 वर्षीय बेपत्ता झालेल्या तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. जुन्या भांडणातून मित्राचा गळा दाबून खून करित तरूणाचा मृतदेह धरणात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. निलेश राजेंद्र कासार (वय 30, रा. जामनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामनेर येथील 30 वर्षीय तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा आई-वडील व बहिणीसह जामनेर येथे वास्तव्यास होता. सोमवार, 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून तो बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती.
कामाच्यानिमित्ताने तिघांमध्ये मैत्री –
याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता, निलेश जळगाव येथील एलटीआय फायनान्स कंपनीत कार्यरत होता. याच कंपनीत दिनेश चौधरी (वय 20, रा. तळई ता. एरंडोल) आणि भूषण बाळू पाटील (वय 20, रा. पिंपरी ता. चोपडा) हेही काम करत होते. हे दोघे सध्या जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे त्यांच्या मामाकडे राहायला आले होते. कामाच्या निमित्ताने तिघांमध्ये मैत्री निर्माण झाली होती.
अखेर, दोघं मित्रांनीच केला घात –
मात्र, काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून निलेश आणि भूषण पाटील यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग भूषण पाटीलच्या मनात होता. दरम्यान, फायनान्सशी संबंधित एका प्रकरणाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने निलेशला शिरसोली येथे बोलावण्यात आले.
शिरसोली गावाजवळील एका शेतात तिघांमध्ये चर्चा फिस्कटली. याच ठिकाणी संशयित भूषण पाटील आणि दिनेश चौधरी यांनी निलेशचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून नेव्हरे धरणात फेकून दिला.
View this post on Instagram
….अन् जामनेरच्या तरूणाचे खून प्रकरण उघडकीस –
निलेश बेपत्ता झाल्यानंतर पोलिस व नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, रामदेववाडी गावाजवळ निलेशची दुचाकी आढळून आली. यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक तपास सुरू केला. चौकशीत संशयित दिनेश चौधरी व भूषण पाटील यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जामनेर येथील बेपत्ता तरूणाच्या प्रकरणासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरलविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर शिरसोली गावालगत दुचाकी आढळली. यानंतर बेपत्ता तरूणाच्या संपर्कातील दोन तरूणांना सुरत येथून ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरूणांकडे विचारपूस केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. यानंतर घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.
डॉ. महेश्वर रेड्डी
पोलीस अधीक्षक, जळगाव
मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर –
दरम्यान, आज 19 डिसेंबर रोजी सकाळी नेव्हरे धरणातून निलेश कासार याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






