जळगाव, 24 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांमधील लम्पी आजारचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरूवात केली. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. (Lumpy Skin Disease)
आठवडे बाजार बंद –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व धरणगाव या ७ तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये सांसर्गिक लम्पी आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामळे या तालुक्यांमधील सर्व जनावरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
प्रशासनाच्या उपाययोजना –
लम्पी साथ रोगाने बाधीत जनावरे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागातील निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रोग विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्यासाठी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जनावरांची खरेदी विक्रीसाठी या ७ तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत.