नाशिक (प्रतिनिधी), 4 नोव्हेंबर : समकालीन प्रकाशन पुणे या सामाजिक संस्थेने मॉडर्न हायस्कूल अशोकनगर नाशिक या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वाचनासाठी ग्रंथालयीन पुस्तके भेट दिली. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या हस्ते ही पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी, ग्रंथालय प्रमुख तेजश्री विधाते, मुक्ता पाठक, नीलंबरी शिरसागर, प्रकाश ओहोळ यांच्याकडे देण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वाचनाने मानवाची बुद्धी तल्लक बनते. वाचनामुळे जीवनात यशस्वी बदल घडून येतात, या शब्दात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. समकालीन प्रकाशन पुणे यांनी स .न . २२ – २३ व २३ -२४ या शैक्षणिक वर्षात असंख्य शाळांना २० -२० पुस्तकांचे दोन संच वाचनालयास दिले देणगीदारांकडून देणगी मिळवुन शाळांना ही पुस्तके प्रत्येक वर्षी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत दिली जातात. प्रत्येक शाळेला किमान अकरा हजाराची पुस्तके दिली जातात, असेही एस. बी. देशमुख यांनी सांगितले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करावा. आपल्या जीवनात अनेक पुस्तकांच्या वाचनामुळे समृद्धता येते. वाचनामुळे माणूस विचारवंत होतो. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपण आपल्या जीवनात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्यासारखे खूप मोठे होण्यासाठी वाचनाची आवड स्वतःमध्ये निर्माण करा, या शब्दात शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्ञानप्राप्तीचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन होय, असा मौलिक सल्ला ग्रंथालय प्रमुख तेजश्री विधाते यांनी देत सर्व उपस्थितांचे व नाशिक मुख्याध्यापक संघाचे आभार मानले.