भडगाव (जळगाव), 15 फेब्रुवारी : “गद्दार-घटनाबाह्य मुख्यमंत्री वेदांत-फॉक्सकॉनसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यावर काहीच बोलले नाही. खुर्ची जेव्हा धोक्यात येते तेव्हा तेव्हा ते शेतात पळतात. रात्री शेती करतात. कधीही महाराष्ट्रासाठी मागितलेले नाही, असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
भडगावातील मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची टीका –
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आदित्य ठाकरेंनी “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र” मेळाव्यात शिवसैनिक, नागरिकांना संबोधित केले. वैशाली सुर्यवंशी यांनी थेट आता विधानभवनात पाठवायचे आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्यात केले. यावेळी त्यांनी शेतकरी, युवक तसेच महिलांच्या सध्यास्थितीतील समस्या उपस्थित करत केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप्रणित राज्यात अस्थिरता –
आदित्य ठाकरे उपस्थितांसोबत संवाद साधताना म्हणाले की, शेतकरी प्रश्नांवर शेतकरी दिल्लीसाठी आंदोलनात निघाले असताना शेतकऱ्यांना अडविण्यासाठी दिल्ली परिसरात केंद्र सरकारने रस्त्यात मोठे अडथळे निर्माण केले आहेत. देशात विचित्र परिस्थिती बनली आहे. ही परिस्थिती वाढली तर भविष्यात मोठे संकट येऊ शकते. तसेच भाजप्रणित राज्यात अस्थिरतेचे चित्र निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.
पेपर फुटीविरोधात सर्वात कडक कायदा करू –
राज्यात अलीकडेच झालेल्या पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावर सरकार काहीही करत नाही. मात्र, मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून वचन देतो की, जेव्हा 2024 मध्ये आपले सरकार सत्तेत बसेल तेव्हा देशातला सर्वात कडक कायदा पेपर फुटीविरोधात करू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.
हिंदुत्वावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? –
आमचे हिंदुत्व हे घरातील चुल पेटवणारे हिंदुत्व आहे तर भाजपाचे घर पेटवणारे हिंदुत्व आहे. पेटवायच्या असतात तर चुल आणि मशाली पेटवायच्या असतात. कारण चुलीने पोट भरत असते तर मशालीने अंधार दुर होत प्रकाश पसरत असतो, अशा निशाणा त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यारून भाजपावर साधला.
मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका –
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गद्दारांना रोजगार मिळाले आहेत. पण सर्वसामान्यांना रोजगार मिळालेत का? जे प्रकल्प राज्यात येणार होते ते प्रकल्प गुजरातमध्ये पाठवले आहेत. वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्पांमुळे एक लाख तरूण-तरूणींना रोजगार मिळणार होता. पण गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर हा प्रकल्प गुजरातेत गेला. मिंधे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. खोके सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर लोटांगण घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी एकतरी नवा रोजगार महाराष्ट्रात आणला आहे का?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्रात आशा वर्कर्सचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांना केवळ आश्वासन देण्यात आहे. ज्या सरकारमध्ये महिलांचा आदर केला जात नाही. ज्या सरकारमध्ये महिलांना शिवीगाळ करण्यात येते आणि असे मंत्री सरकारमध्ये बसलेले आहेत. ज्या सरकारमध्ये महिलांना शिवीगाळ करण्यात येते आणि असे मंत्री सरकारमध्ये बसलेले आहेत अशा सरकारकडून काय अपेक्षा करायच्या? आपलं हिंदूत्व स्पष्ट आहे जो कुणी बलात्कार करेल त्याला फासावरच चढवले पाहिजे हे आपले हिंदूत्व आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : मोठी बातमी! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा’, राहुल नार्वेकर यांचा निर्णय