चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर, 4 मार्च : बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणायलाही त्यांची जीभ कचरत होती, सावरकरांचा अपमान होत असताना मूग गिळून गप्प बसायला लागत होते आणि बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जागा झाला म्हणून आम्ही तो उठाव केला, धाडसे केले अन् अवघ्या जगाने ते पाहिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन –
मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात बोलत होते. आमच्यावर आरोप होतात मात्र, त्या आरोपांनी आम्ही आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.
अन् 50 खोक्यांचे बक्षीस मिळवा –
आम्ही बाळासाहेबांचे विचार घेत त्यांच्या सोबतीने शिवसेना मोठी केली. जेलमध्ये गेलो, केसेस अंगावर घेतल्या. तेव्हा तुम्ही कुठे गेले होते, असा प्रश्न उपस्थित करत तुमच्यावरील एक तरी केस (गुन्हे) दाखवा आणि 50 खोक्यांचे बक्षीस मिळवा, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. बाळासाहेबांची विचार हीच आमची संपत्ती असून एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आजही, कालही आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करेन, असेही त्यांनी सांगितले.
म्हणून आम्ही सरकार स्थापन केले –
बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि मोहपायी तुम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. मात्र, आम्हाला ते बघितले जात नव्हते. म्हणून मला आम्हाला वाटायचं भाजपसोबत आपण सरकार स्थापन केले पाहिजे आणि सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन (व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार-खासदार यांना उद्देशून) आम्ही महायुतीचे सरकार स्थापन केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ठ केले. आमचे सरकार तरूण, महिला आणि शेतकरी तसेच नोकरदारांच्या विकासासाठी काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायत, कोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंय, कोणाला शेती आवाजरे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन –
संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी मुक्ताईनगर मध्ये त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे अत्यंत श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली
हेही वाचा : ‘जो मराठा समाजासाठी आडवा येतोय, त्याला निवडणुकीत…..’, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?