धुळे, 11 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजी नाट्य होत असताना धुळे लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर आली आहे. धुळे मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. स्थानिकांना उमेदवारी न दिल्याने स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील संतप्त झाल्याचे समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाटेला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून धुळ्यासाठी उमेदवार जाहीर करत असताना मोठी चाचपणी केली जात होती. दरम्यान, काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्यास सुरूवात झाली.
काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा –
डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा इच्छुक उमेदवार शामकांत सनेर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा देत असल्याचे पत्र लिहिले आहे. धुळे लोकसभा मतदार संघात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर इच्छुक असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, दोन दिवसात पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेणार, असा इशारा शामकांत सनेर यांनी दिला आहे.