ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून आज दुपारी पाचोरा तालुक्यासह जळगाव ग्रामीणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारणतः 10 ते 15 मिनिटे हा पाऊस बरसला.
जळगाव जिल्ह्यात सकाळ पासूनच बदलीचे वातावरण असताना कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण दिसून आले. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी, नगरदेवळा, वडगाव, सातगाव डोंगरी, शिंदाड, लासगाव, नांद्रा, सामनेर, आदी गावांत विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
‘असा’ राहील हवामानाचा अंदाज –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात पुढील काही तास पावसाचे असणार आहेत. यामध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची उन्हाळी कामे अंतिम टप्प्यात आल्याने पावसाने नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : खान्देशात महायुती विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, कोण-कोणाविरोधात लढणार; वाचा, एका क्लिकवर