अमळनेर, 13 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात येत असताना अमळनेर येथील सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करणे सुरू केले आहे. एककीडे शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. तर दुसरीकडे मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
विद्यार्थ्यी बनले मतदार प्रबोधन दूत –
साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी 300 विद्यार्थ्यांना मतदार प्रबोधन दूत नेमून अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांची मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड करण्यात आली.
मतदानाच्या जनजागृतीसाठी नेमका कोणता उपक्रम –
नोडल अधिकारी डी. ए. धनगर यांच्या संकल्पनेने मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांची निवड केली. मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड झालेले विद्यार्थी आपल्या कुटुंबात व परिसरातील इतर दहा कुटुंबात जाऊन मतदान करण्याविषयी फायदे सांगतील. मतदानापूर्वी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी हे विद्यार्थी परिश्रम घेणार आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.
मतदान जनजागृती करणे गरजेचे –
लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवून योग्य लोकप्रतिनिधी निवडून जावा यासाठी मतदान जनजागृती करणे गरजेचे आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे काम आनंदाने स्विकारले. यावेळी लोकशाहीचा जागर करण्यासाठी आमचाही वाटा आहे म्हणत त्यांनी शेतकरी, वस्ती, मजूर, वस्ती आदी ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती केली. विशेष म्हणजे विद्यार्थी गणवेशात ‘मतदान करा’ असे लिहिलेल्या टोप्या घालून मतदान जनजागृती करीत आहेत.
दरम्यान, या अभिनव उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.
‘अशी’ होणार मतदार जनजागृती –
गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांची मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये एक मतदार प्रबोधन दूत 10 कुटुंबात जाणार आहे, एका कुटुंबात 4 मतदार, म्हणजे 40 मतदारांमध्ये जनजागृती होणार आहे. तसेच 300 मतदार प्रबोधन दूत कमीतकमी 40×300= 12000 मतदार होतील. पण काही विद्यार्थी 10 पेक्षा जास्तच करतील. म्हणजेच या मतदान जनजागृतीतून 12000 ते 16000 मतदार जागृती होईल.
हेही वाचा : बेमोसमी पावसाचा मोठा फटका, अमळनेरच्या आमोदे शिवारात शेतपिकांचे प्रचंड नुकसान