मुंबई, 20 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी महायुतीत जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला होता. दरम्यान, हा तिढा आता सुटत असून छत्रपती संभाजीनगरच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला असून याठिकाणी उमेवादाराची घोषणा करण्यात आली आहे.
संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर –
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांनाच उमेदवारी मिळणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने ते आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख लढती –
महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे असून माजी खासदार चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढत आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढत आहेत. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने छत्रपती संभाजीनगरात चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : रोहणी खडसे यांना भाजपसोबत आणण्याच्या मुद्यावरून नणंदने भावजयली सुनावले, काय आहे संपूर्ण बातमी?