धुळे, 29 एप्रिल : धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर जिजामाता विद्यालय परिसरात जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणार –
महायुतीतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धुळ्यातील पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाईल. यानंतर तेथून वाद्यांच्या गजरात तसेच घोषणांच्या दणदणाटात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार असून खासदार डॉ. सुभाष भामरे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक शिष्ठमंडळासह अर्ज दाखल करतील.
तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात –
धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे हे मागील दहा वर्षांपासून धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिसऱ्यांदा संधी देत निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. डॉ. सुभाष भामरे यांची काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याविरोधात लढत रंगणार आहे.
कोण-कोण राहणार उपस्थित –
भाजपच्या प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम भदाणे, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार! कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?