चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 2 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून महायुती असो वा महाविकास आघाडी यामध्ये अंतर्गत नाराजीचे अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुक्ताईनगरात त्यांची भेट घेतली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांच्यात स्थानिक राजकारणामुळे जरी मतभेद असले तरी मनभेद नाहीयेत. कारण शेवटी ते अपक्ष लढले असून त्यांचा मोठा सन्मान आहे. चंद्रकांत पाटील यांनी विकसित भारतासाठी मोदीजींना साथ द्यावी, अशी विनंती मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांना केली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील नाराज? –
चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते नाराज आहेत. आणि सर्वीकडे स्थानिक राजकारणात अशा पद्धतीचे नाराजी दिसून येते. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होत असतात. शेवटी विचार महत्वाचे असतात. मात्र, त्यांनी जो विचार केला आहे, तो मोठा विचार केला. देशाच्या विकास व कल्याणासाठी मोदींच्या मागे उभे राहणे, हा त्यांचा उद्देश आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ठीकरण –
तसेच यासाठी स्थानिक राजकारण बाजूला करावे लागते. दरम्यान, त्यांनी माझी विनंती मान्य केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकून आणण्यासाठी आमची टीम मोठ्या ताकदीने काम करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी मला आश्वस्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने मुक्ताईनगरातून मोठ्या मताधिक्याने रक्षा खडसेंना निवडून आणू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीचे नेमकं कारण काय? –
चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरचे आमदार असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहणी खडसेंच्या विरोधात अपक्ष म्हणून जिंकून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे शिवसेनेकडून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, भाजप व शिवसेनेत युती असल्याने मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला आला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत रोहिणी खडसेंचा पराभव केला. तेव्हापासून आमदार चंद्रकांत पाटील व खडसे कुटुंबियांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.
दरम्यान, रक्षा खडसे यांचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चा होत असताना देखील त्यांना तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीची संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध दिसून आला होता. मात्र, रक्षा खडसे यांचा सध्यास्थितीत सुरळीतपणे प्रचार सुरू असताना आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या प्रचारात सहभागी होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
हेही वाचा : पॉर्नस्टारच्या मुद्द्यावरून भाजप-ठाकरे गटात जुंपली, पक्षातील महिला नेत्यांनी केले एकमेकांवर पलटवार