चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 21 मे : पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? –
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषेदत पोर्श कार अपघात प्रकरणी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, या अपघात प्रकरणात सर्वप्रथम न्यायालयाने केलेली सुनावणी पोलीस प्रशासन तसेच लोकांसाठी धक्कादायक आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू होऊनही अगदी सहजतेने आरोपींना सोडून देणे, हे सहन केले जाणार नाही. त्यावर उचित कारवाई केली जाईल. यासाठी पोलिस प्रशासनाकडून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. यावर लवकरच न्यायालयाकडून आरोपींना रिमांड देण्याचे आदेश प्राप्त होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणात दोषींवर कारवाई होण्यासाठी आणि संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
योग्य ती कारवाई केली जाईल –
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणानंतर, ज्यांनी अल्पवयीनांना दारू दिली त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपला मुलगा अल्पवयीन असूनही त्याला त्याच्या वडिलांकडून गाडी दिली गेली, यामुळे कायद्याच्या अंतर्गत संबंधित प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची पुढची कारवाई पोलिस करणार आहेत. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीरतेने घेतले आहे. तसेच सदर प्रकरणातील बारीकमधील बारीक गोष्टी तपासल्या जातील आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणातील आरोपी 17 वर्षांच्या असल्याने निर्भया हत्याकांडानंतर त्यांना अडल्ट म्हणून ट्रिट केले जाऊ शकते. यांसदर्भातील रिमांड अर्ज देखील माझ्याकडे आहे. आरोपीवर सादर केलेली कलम 304 ए नसून 304 आहे. दुर्देवाने न्यायालयाने त्याच्यात वेगळी भूमिका घेऊन आणि अडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे त्याला बाजूला ठेवत रिमांडच्या अर्जावर अतिशय सहजतेने निरक्षण नोंदवत आरोपीला दुसऱ्याच गोष्टींचे पालन करायला लावले. हा पोलिसांकरिता धक्काच आहे.
संबंधित प्रकरणात सर्व पुरावे देत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखल देऊनही अशा पद्धतीने भूमिका घेतली जाते ती भूमिका शासनाच्या आणि नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करते. न्यायालयाने केलेली सुनावणी धक्कादायक असून आम्ही त्याविरोधात दाद मागणार आहोत. यासाठी जिथपर्यंत जावे लागेल, तिथपर्यंत जायची भूमिका पोलिसांची आहे.
गृहमंत्र्यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना –
अपघात प्रकरणानंतर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजन करण्यासाठी आवश्यक ते पाऊले उचलण्यासाठी सूचना देण्यात येतील. यामध्ये पबची तपासणी, ओळखपत्र तपासणी न होणे, सीसीटीव्ही तपासणे, ड्रंक अँड ड्राईव्हिंगविरोधात प्रभावीपणे कारवाई, मिळालेल्या परवान्यांचे पालन होत आहे की नाही याबाबत तपासणी केली जाईल. ज्याठिकाणी उल्लंघन होत असेल तर त्याठिकाणी परवाने रद्द केले जातील.
सीसीटीव्ही फुटेज तपसाण्याचे आदेश –
पुणे पोर्श अपघात प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, अपघात प्रकरणी पोलीस प्रशासन अलर्ट असून योग्य ती कारवाई केली जात आहे. तसेच अल्पवयीन आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये कशापद्धतीने वागणूक देण्यात आली, यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपसाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये जे-जे आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा : अपघातात दोघांना ठार केले; मात्र, अवघ्या 15 तासात मिळाला जामीन अन् आता गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश